Friday, June 7, 2013

आज तरी...

तू म्हणशील तिथे येतो
तू म्हणत असशील तर आज ऑफिसला दांडी मारतो

तुला आवडेल तिथे जाऊ
तुझ्या मनाची गाणी गाऊ

तीच झाडे, तेच पक्षी , तेच आकाश
सूर्यास्त ही तोच... रोजच होणारा
...
आज तुझ्या डोळ्यातुन पाहू दे

आता तरी, एकदा तरी,
या वाऱ्यावर स्वार होऊ
  वाऱ्याहून उनाड हे मन
... आज मनात येइल तिथे जाऊ!

नाहीतर जगापासून लांब
ताऱ्यांना चिटकून
आपल्या गच्चीवरच बसू की
खुर्च्या टाकून

वेळेचे बंधन नाही
गप्पांना आवर नहीं
गप्पांच्या जोडीला चहा
चहाच्या जोडीला क्रीमरोल
.... एक संपला तर दुसरा मागवू !

आज नवे काहीतरी स्फुरू दे
नवे  काहीतरी होऊ  दे
नेहेमी जे टाळतो
ते  आज बोलून जाऊ

आज तू फक्त  तू म्हणून
मी फक्त मी म्हणून
आणि या आयुष्याकडे
केवळ  एक गंमत म्हणून
... बघू दे !

आज जरा निवांत
एकांतात अनंत
... पाय पसरून बसू  दे !

जन्मभाराचे  बोलायचे आहे
पण बोलणे हेही एक निमित्त
तुझ्या  चेहऱ्यावरचे हसू
बघण्याचा स्वार्थ

शब्दांनी तू हसतेस
आणि तू हसलीस
  .... की शब्द संपतात!

आज माझे काही मागणे नाही
आयुष्याचे  सर्व व्याप दूर सारून
हा असा, इथे, तुझ्यासाठी,
तुझ्या आनंदाचे प्रतिबिंब  म्हणून!